शनिवार, ३० जुलै, २०१६

' इव्हेँट ' आणि वास्तव !

आजऱ्याच्या बसस्थानकावरचे झाड तोडले तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना प्रायश्चित म्हणून आपण २५ झाडे लावून घेतली होती . रोज किंवा २ - ४ दिवसांतून जाऊन बघायचो काय झालंय झाडांचं . आज त्यातली १९ झाडे जिवंत आहेत आणि बरीच वाढली आहेत . त्यातलं एक वडाचं झाड आहे इथे . गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही .
         १ जुलैचा वृक्ष लागवडीचा ' इव्हेंट ' ह्या डोळ्यांनी मी पहिला आहे . चव्हाणवाडीवर मी , राजू देसाई , आणि बाबू कांबळे असे तिघेजण गेलो होतो . तेथे गेल्यावर असे दिसले की इव्हेंटची तयारी करण्यात वनकर्मचाऱ्यांनी कोणतीच कसूर ठेवली नव्हती . पण मी मात्र समाधानी नव्हतो . हरेक राजकीय पार्टीचा नेता तिथे येत होता आणि झाड लावत असलेला फोटो काढून घेऊन मार्गस्थ होत होता . शाळेच्या मुलांना मास्तरांनी सोबत आणले होते . मुलांसाठी ही जणू ट्रिपचा आनंद देणारी गोष्ट होती . झाडांबद्दल आणि पर्यावरणाबद्दल त्यांच्या शिक्षकांच्या काय भावना होत्या ते मला माहीत नाही ; पण झाडे लावून आपण पर्यावरणावर उपकार करत असल्याचा अविर्भाव मला दिसला . त्या मुलांनी इतस्त: फेकलेल्या प्लॅस्टिकच्या ग्लासांकडे पाहून अजून मला वाईट वाटत होते . ते ग्लास उचलून मी बाजूच्या खोक्यात टाकले .
वनकर्मचाऱ्यांनी आणलेल्या झाडांची उंची खूपच कमी होती असे मला जाणवले . यावर श्री . डेळेकर साहेब आणि श्री . कातळे साहेब यांनी सांगितले की , ' काही होत नाही सर सर्व झाडे जगतील ! ' मला त्यांच्या या आशावादाचे खूपच कौतुक वाटले . वनविभागातले हे असे काही कर्मचारी आहेत की जे झाडांवर ड्युटी म्हणून नाही  तर मनापासून प्रेम करतात ! तरीही झाडे कमी उंचीची असणे , त्यांच्या जवळ काठी न खोवणे , त्या झाडांच्या सुरक्षेसाठी भोवती कुंपण न करणे , झाडांच्या रोपांची प्लॅस्टिकची पिशवी गोळा न करणे , खड्डयांची खोली समाधानकारक नसणे या मुद्द्यांमुळे मला हा नुसताच फार्स वाटला .
परंतु एक बाजू अशीही आहे की , डेळेकर साहेब आणि कातले साहेब दोघांनीही ही झाडे ८ दिवसांनी येऊन बघा असा आत्मविश्वास दाखवला आहे . मला ह्या माणसांवर विश्वास आहे .
2) आजरा कॉलेजात शिकणाऱ्या दादू गाईंगडे व त्याच्या मित्रांनी पेरणोलीच्या डोंगरात  झाडे लावली . वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मी ' इव्हेंट ' च्या  दिवशी ( 1 जुलैला ) म्हटले होते की आपल्याला अजून किमान 500 - 1000 झाडे लावायची आहेत . त्यांनी मग पेरणोलीच्या डोंगरात झाडे लावण्याचे नियोजन केले. आणि ह्या सगळ्या मित्रमांदियाळीसोबत जाऊन जवळपास 700 रोपे लावली . कॉलेजातून सरळ डोंगरात येणाऱ्या मुलांच्या चपाती भाजीची सोय वनविभागाच्या वतीने करण्यात आली होती . मुलांच्या ऊत्साहाने कमाल केली . किरकोळ भाग सोडला तर संपूर्ण पठारावर औषधी आणि इतर रोपांची लागवड केली .
             शिवजयंतीच्या उत्सवात तलवारी नाचवत नाचणाऱ्या आणि गडावरून ज्योती / मशाली आणून महाराजांचे पांग फेडल्याच्या भ्रामक समजुतीत आसणाऱ्या अनेक तरुणांना महाराजांच्या स्वप्नाला साकार करायला म्हणजे वृक्ष लागवडीला येता काय म्हणून विचारले ; तर त्यांनी विविध कारणे सांगून बाजू मारली . मला वाईट वाटले क्षणभर . पण ह्या NR बॉईजनी मात्र मला उत्साहित केले .न थकता प्रचंड ऊत्साहाने वृक्षारोपण पार पडले . प्लास्टिकच्या पिशव्याही गोळा केल्या . यात वनकर्मचाऱ्यांचा उत्साह फारसा जाणवला नाही . त्यांच्यासाठी हे दरवर्षीचं काम आहे . दरवर्षी झाडे लावायची , दरवर्षी आगीत किंवा पाण्याच्या अभावाने ती मरतात , मग पुढच्या पावसाळ्यात त्याच जाग्यावर दुसरी झाडे लावायची ....आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या ...!
        बबलू शेखने बोललेलं वाक्य मला आठवलं , ' फॉरेस्ट विभागात  झाडावर जीव आसणारी माणसं का भरती करत नाहीत ? माझ्याबरोबर खुपता तो जंगल किंवा झाडाला लागलेली आग विझवायला आला होता . विभागातल्या फॉरेस्टरनी सगळी सोय उत्तम केली पण ; खड्डा खणणे , झाडे लावणे असे केल्याचं मला दिसलं नाही . वयामुळं त्यांना थकवा आलेला जाणवला ... तरीही त्यांनी आलेल्या मुलांचे खूप कौतुक केले . असो !
     ....  तर अशी आहे यावर्षीची वृक्षारोपणाची ' स्टोरी ' ...... साता उत्तरा सुफळ ( कळेलच नंतर ..! ) संपन्न !
:-D  या युवकांनी 14 जुलैच्या वृक्षारोपणाची धुरा सांभाळली ! :-

Shridhar Gaingade
Vaibhav Bolke
Vaibhav Salokhe
Rony Fernandes
Akshay Shivane
Omkar Sutar
Ketan Palkar
Peter Fernandes
Suraj Katkar
Ajit Mulik
Akshay Gelekar
Vishal Kamble
Sohel Nesarikar
Sushant Nirmale
Rohit Desai

सोमवार, ११ जुलै, २०१६

शोध चालूच राहील .....

श्री अरुण एखंडे , ब्रिजमोहन पाटील , इन्स्पे . केडगे साहेब , डीसीपी साकोरे साहेब, मुख्यमंत्र्यांचे बॉडीगार्ड येवले साहेब , सीबीआय चे मोरे साहेब , सांगलीचे मा . प्रतीक पाटील यांचे बंधू मकरंद पाटील इत्यादी माणसांच्या साहाय्याने शेवटी माझा हरवलेला फोन मिळाला . तो आणून दिला एलसीबी चे संदीप गुरव साहेब यांनी . त्यांचे मनापासून आभार ! 
मी तब्बल ५ महिने ह्या फोनसाठी खूप फिरलो . खूप लोक मला म्हणाले की ' दुसरा फोन घेऊन देतो सर त्या फोनचा नाद सोडा ! ' पण फोनचा शोध माझ्यासाठी वेगळ्या अर्थाने मला अनुभवाच्या दृष्टीने समृद्ध करणारा होता . शिवाय हा फोन दिलेल्या समाजसेवी माणसाच्या प्रेमाचा हा विषय होता . 
फोन आणण्यासाठी दोनदा सांगलीत गेलो . इम्रान पुणेकर ह्या मित्राची तिथे खूपच मदत झाली . अधोरेखित करण्याची बाब म्हणजे फोन मिळाल्यावर मी एकदम आनंदित झालोच नाही . का कुणास ठाऊक . ' माझी सान्तियागोगिरी ' नावाच्या ब्लॉगमध्ये मी फोनच्या शोधाने मला कसे कसे अनुभव आले ते मी लिहिले आहे . या फोनमधला डाटा मला मिळाला नाहीच . पण मी उदास नव्हतो . कारण मी अनुभवलेल्या ठिकाणांना आणि पाहिलेल्या माणसांना खूपच गडदपणे माझ्या डोळ्यांसमोर आत्तादेखील पाहू शकतो . मी जेव्हा डॉ . अनमोल कोठाडियांना म्हटले की , ते सगळे क्षण जे मी क्लिक केले होते ते माझ्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे आत्ताही आहेत ... तेव्हा ते म्हणाले की , seeing and expierincing is important than clicking ! मलाही तसेच वाटते . आपण पाहिलेल्या कित्येक गोष्टी पाहताक्षणीच क्लिक करून जपून ठेवण्याच्या मागे लागतो . अनुभवण्याची क्षमताच जणू हरवलेय !
फोनमधल्या माहितीच्या गैरवापरही मला सतत चिंता लागून राहिलेली असायची; आजही आहे ! फोन नसण्याच्या कालखंडात खूपदा मनोरुग्णांचे , झाडांना ठोकलेल्या फलकाचे फोटो , जखमी गायीचे फोटो इ . गोष्टी सुटल्या . उपचार झाले पण अनेक व्यत्यय आले . घटनास्थळ किंवा इतर बाबींच्या अनुषंगाने फोटोंच्या नसण्याने किंवा सोबत इंटरनेट नसण्याचे खूपच तोटे झाले . पण काही वाईट नाही ; त्यामुळे पर्यायी मार्ग शोधणे आणि त्या दृष्टीने अजून वेगळ्या अंगांनी समस्येवर तोडगा येतो हेही कळले . 
मूळ विषय आहे मिरज पोलिसांनी ( Miraj govt. railway police ) दाखवलेल्या अतिशय उदासीन दृष्टिकोनाचा ! २४ जानेवारी २०१६ ला तक्रार होती . तक्रार दाखल करून घेणाऱ्या राठोड नामक पोलिसाने दाखल करून घेतानाच ' गहाळ ' अशी दाखल करून घेतली ; यामुळे त्यांची जबाबदारीची टक्केवारी त्यांनी कमी करून घेतली ! दाखल करून घेतल्यानंतर त्यांनी मला तसा दाखला दिला . त्यानंतर मी केलेल्या कित्येक फोनांना उत्तर म्हणून त्यांनी ' अजून स्ट्रेस झालेला नाही तुमचा फोन , शोध सुरू आहे .... ! ' असे सततचे उत्तर पाठ करून माझ्या माथी मारले . मी दरेकर नावाच्या पोलिसांना सांगितले की , ' या फोनमध्ये कित्येक मनोरुग्णांचे फोटो आहेत , मनोरुग्णांनी विशेषतः स्त्री मनोरुग्णांनी सांगितलेल्या त्यांच्या विदारक आणि काही कच्च्या - पक्या जन्मकहान्या आहेत ..... ' माझ्या घालमेलीशी , तळमळीशी त्यांना जणू काहीच देणेघेणे नव्हते . दरेकरांशी सतत बोलून काहीच फायदा होत नसल्याचे मला निदर्शनास आल्यानंतर मी ब्रिजमोहन पाटील ( पुण्यातले पत्रकार ) यांच्या कानावर हा विषय घातला . त्यांनी पुण्याचे डीसीपी साकोरे साहेबांची भेट घालून दिली . त्यांच्या सल्ल्याने श्री अत्तारे साहेब यांनी या प्रकरणात मोलाची भूमिका केली . श्री अत्तारे साहेब यांनी तो फोन स्ट्रेस करून मला तशी माहिती दिली . एक फोन उत्तर प्रदेशात आणि दुसरा फोन असल्याचे त्यांनी सांगितले . तब्बल तीन महिन्यांनी ही बातमी माझ्या कानावर पडली होती . दरेकरांना हे सांगण्यासाठी मी फोन केला . तेव्हा त्यांनी दोन्ही फोन उत्तर प्रदेशात असल्याचे मला सांगितले ! सांगलीतल्या या फोनचा पाठलाग करणे मिरज ( Miraj govt. railway police )आणि विशेष करून दरेकरांना शक्य होते पण त्यांनी तत्परता दाखवली नाही . दरेकरांनी मला सतत ' साहेबांनी सांगितले तर मी जातो .... ' हे उत्तर दिले . साहेबांच्या आदेशाची ते वाट पाहत बसले .' सामान्य माणसाच्या फोनचा तपास ' अशा भूमिकेतून हा तपास व्हावा असे मला सुरुवातीपासून अपेक्षित होते ....! नाईलाजाने शेवटी मी आतापर्यन्त ज्या मानसिकतेतून हा सर्व तपास व्हावा असे मानत होतो तो विचार बदलला . सामान्य माणसांच्या तक्रारींबाबत पोलिसांची अशी भूमिका असणार आहे ; मी समाजसेवक किंवा आणखी कुणी का असेना ! 
शेवटी मिरज ( Miraj govt. railway police )पोलिसांनी दाखवलेय उदासीन दृष्टिकोनामुळे मी हा विषय माझ्या जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे बोललो . ( केडगे साहेब ) तेव्हाच हा विषय अरुण एखंडे साहेबांनी प्रतीक पाटील यांच्या बंधूंकरवी एलसीबी च्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातला आणि मग तत्परतेने त्यांनी तपास करून , शोध पाडून , त्या गावात जाऊन फोन आणला . आणि मला तसा त्यांनी फोन करून सांगितले . ' दुसराही फोन शोधून देतो काही काळजी करू नका सर ... तुम्ही खूप चांगले काम करत आहात , तुमच्या उपयोगी पडता आल्याचे कौतुक आहे ही त्यांची फोनवरचे प्रतिक्रिया मला महत्वाची वाटते . 
खूपदा वाटले की हा विषय थोडा गंभीर करावा . त्या दोन्ही फोनमधली माहिती अतिशय महत्वाची होती . तिचा गैरवापर होणं माझ्यादृष्टीने खूपच वाईट / घातक होतं . पण मी विषयाला सैल सोडले . कारण पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवली होती . फोन सापडलेल्या दिवशी मी माझी गाडी तडक मिरज ( Miraj govt. railway police ) कडे हाकली . तिथे भिंगारदेवे नावाचे पोलीस अधिकारी मला प्रत्यक्षच भेटले . साहेब गडबडीत होते . त्यांनी या विषयात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . .... पण खरं बोलायचं तर त्यांनी माझ्या तोंडाला पानेच पुसली होती . चोरी करणं जसा गुन्हा आहे तसाच चोरीचा माल विकत घेणे गुन्हाच नाही का ! मी हे एल . एल . बी.च्या वर्गात शिकूनसुद्धा साहेबांना सुलभ अशी काहीच प्रतिक्रिया दिली नाही . कुणीतरी नातेवाईक आजारी असल्याचे ते बोलत होते . बाकी वाईट ह्या गोष्टीचे वाटते की , त्यांनी मनात आणले असते तर संबंधित माणसाला आणून त्याच्याकडे चौकशी केली असती . त्याने काही तरी लीड दिली असती . त्याने काहीतरी माहिती नक्कीच दिली असती . पण ' बघतो , करतो ' ह्या त्यांच्या आश्वासनांनि मला खात्री दिली की आता हे काम ' रामभरोसेच ' असेल ! तरीही मी न चिडता बाहेर पडलो . पण मी या मतावर आजही ठाम आहे की पोलिसांनी मनात आणले तर ते कुठल्याही गुन्ह्याचा छडा लावू शकतात . 
ह्या फोनच्या शोधाच्या निमित्ताने मला पोलिसांमधल्या ह्या दोन भूमिकांचे विश्लेषण करावे वाटले ; ते मी केले आहेच . सबंध शोधात माझ्यासारख्या प्रचंड ओळखीचा खजिना असणाऱ्या माणसाला जे अनुभव आले ते पाहता सामान्य माणसाच्या फिर्यादीचे काय हाल होत असतील याची आपण कल्पनाच केलेली बरी !