आजऱ्याच्या बसस्थानकावरचे झाड तोडले तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना प्रायश्चित म्हणून आपण २५ झाडे लावून घेतली होती . रोज किंवा २ - ४ दिवसांतून जाऊन बघायचो काय झालंय झाडांचं . आज त्यातली १९ झाडे जिवंत आहेत आणि बरीच वाढली आहेत . त्यातलं एक वडाचं झाड आहे इथे . गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही .
१ जुलैचा वृक्ष लागवडीचा ' इव्हेंट ' ह्या डोळ्यांनी मी पहिला आहे . चव्हाणवाडीवर मी , राजू देसाई , आणि बाबू कांबळे असे तिघेजण गेलो होतो . तेथे गेल्यावर असे दिसले की इव्हेंटची तयारी करण्यात वनकर्मचाऱ्यांनी कोणतीच कसूर ठेवली नव्हती . पण मी मात्र समाधानी नव्हतो . हरेक राजकीय पार्टीचा नेता तिथे येत होता आणि झाड लावत असलेला फोटो काढून घेऊन मार्गस्थ होत होता . शाळेच्या मुलांना मास्तरांनी सोबत आणले होते . मुलांसाठी ही जणू ट्रिपचा आनंद देणारी गोष्ट होती . झाडांबद्दल आणि पर्यावरणाबद्दल त्यांच्या शिक्षकांच्या काय भावना होत्या ते मला माहीत नाही ; पण झाडे लावून आपण पर्यावरणावर उपकार करत असल्याचा अविर्भाव मला दिसला . त्या मुलांनी इतस्त: फेकलेल्या प्लॅस्टिकच्या ग्लासांकडे पाहून अजून मला वाईट वाटत होते . ते ग्लास उचलून मी बाजूच्या खोक्यात टाकले .
वनकर्मचाऱ्यांनी आणलेल्या झाडांची उंची खूपच कमी होती असे मला जाणवले . यावर श्री . डेळेकर साहेब आणि श्री . कातळे साहेब यांनी सांगितले की , ' काही होत नाही सर सर्व झाडे जगतील ! ' मला त्यांच्या या आशावादाचे खूपच कौतुक वाटले . वनविभागातले हे असे काही कर्मचारी आहेत की जे झाडांवर ड्युटी म्हणून नाही तर मनापासून प्रेम करतात ! तरीही झाडे कमी उंचीची असणे , त्यांच्या जवळ काठी न खोवणे , त्या झाडांच्या सुरक्षेसाठी भोवती कुंपण न करणे , झाडांच्या रोपांची प्लॅस्टिकची पिशवी गोळा न करणे , खड्डयांची खोली समाधानकारक नसणे या मुद्द्यांमुळे मला हा नुसताच फार्स वाटला .
परंतु एक बाजू अशीही आहे की , डेळेकर साहेब आणि कातले साहेब दोघांनीही ही झाडे ८ दिवसांनी येऊन बघा असा आत्मविश्वास दाखवला आहे . मला ह्या माणसांवर विश्वास आहे .
2) आजरा कॉलेजात शिकणाऱ्या दादू गाईंगडे व त्याच्या मित्रांनी पेरणोलीच्या डोंगरात झाडे लावली . वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मी ' इव्हेंट ' च्या दिवशी ( 1 जुलैला ) म्हटले होते की आपल्याला अजून किमान 500 - 1000 झाडे लावायची आहेत . त्यांनी मग पेरणोलीच्या डोंगरात झाडे लावण्याचे नियोजन केले. आणि ह्या सगळ्या मित्रमांदियाळीसोबत जाऊन जवळपास 700 रोपे लावली . कॉलेजातून सरळ डोंगरात येणाऱ्या मुलांच्या चपाती भाजीची सोय वनविभागाच्या वतीने करण्यात आली होती . मुलांच्या ऊत्साहाने कमाल केली . किरकोळ भाग सोडला तर संपूर्ण पठारावर औषधी आणि इतर रोपांची लागवड केली .
शिवजयंतीच्या उत्सवात तलवारी नाचवत नाचणाऱ्या आणि गडावरून ज्योती / मशाली आणून महाराजांचे पांग फेडल्याच्या भ्रामक समजुतीत आसणाऱ्या अनेक तरुणांना महाराजांच्या स्वप्नाला साकार करायला म्हणजे वृक्ष लागवडीला येता काय म्हणून विचारले ; तर त्यांनी विविध कारणे सांगून बाजू मारली . मला वाईट वाटले क्षणभर . पण ह्या NR बॉईजनी मात्र मला उत्साहित केले .न थकता प्रचंड ऊत्साहाने वृक्षारोपण पार पडले . प्लास्टिकच्या पिशव्याही गोळा केल्या . यात वनकर्मचाऱ्यांचा उत्साह फारसा जाणवला नाही . त्यांच्यासाठी हे दरवर्षीचं काम आहे . दरवर्षी झाडे लावायची , दरवर्षी आगीत किंवा पाण्याच्या अभावाने ती मरतात , मग पुढच्या पावसाळ्यात त्याच जाग्यावर दुसरी झाडे लावायची ....आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या ...!
बबलू शेखने बोललेलं वाक्य मला आठवलं , ' फॉरेस्ट विभागात झाडावर जीव आसणारी माणसं का भरती करत नाहीत ? माझ्याबरोबर खुपता तो जंगल किंवा झाडाला लागलेली आग विझवायला आला होता . विभागातल्या फॉरेस्टरनी सगळी सोय उत्तम केली पण ; खड्डा खणणे , झाडे लावणे असे केल्याचं मला दिसलं नाही . वयामुळं त्यांना थकवा आलेला जाणवला ... तरीही त्यांनी आलेल्या मुलांचे खूप कौतुक केले . असो !
.... तर अशी आहे यावर्षीची वृक्षारोपणाची ' स्टोरी ' ...... साता उत्तरा सुफळ ( कळेलच नंतर ..! ) संपन्न !
:-D या युवकांनी 14 जुलैच्या वृक्षारोपणाची धुरा सांभाळली ! :-
Shridhar Gaingade
Vaibhav Bolke
Vaibhav Salokhe
Rony Fernandes
Akshay Shivane
Omkar Sutar
Ketan Palkar
Peter Fernandes
Suraj Katkar
Ajit Mulik
Akshay Gelekar
Vishal Kamble
Sohel Nesarikar
Sushant Nirmale
Rohit Desai